नवी दिल्ली : लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची तयारी महाराष्ट्र प्रदेश भाजपाने सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे प्रदेश भाजपनं पाठवल्याचंही पुढे आल आहे. ‘द हिंदू’ या वर्तमानपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.
2024 च्या एप्रिल आणि मे महिन्यात देशात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीनंतर अवघ्या चार ते पाच महिन्यातच महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळही संपत आहे. म्हणूनच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका सोबत घेणे शक्य होणार आहे.
मोदींचा करिष्मा चालणार का?
‘द हिंदू’ने आपल्या बातमीत महाविकास आघाडी स्थापन केलेल्या विरोधी पक्षांच्या युती आणि शिवसेना पक्षात झालेली फुट यामुळे प्रदेश भाजपाने तसा प्रस्ताव दिल्याचे म्हटले आहे. भाजप प्रदेश नेतृत्वाला असे वाटतेय की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत नुकत्याच स्थापन झालेल्या युतीच्या अंतर्गत कारभाराचा मतदारांना सकारात्मक परिणाम होण्यात थोडा वेळ लागू शकतो. विधानसभा निवडणुकीची वेळ सार्वत्रिक निवडणुका घेतल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आणि राष्ट्रीय मुद्दे देखील मतदारांना प्रभाव टाकतील. महाराष्ट्र भाजपनं दिलेल्या प्रस्तावावर केंद्रीय नेतृत्व सध्या विचार करत असल्याचे देखील ‘द हिंदू’ने आपल्या बातमीत म्हटले आहे.
आयोगाने दिले होते संकेत
दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास निवडणूक आयोग आणि प्रशासन सज्ज असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी नुकतीच निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आले असतांना भंडाऱ्यात दिली होती.