मुंबई: भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस नववर्ष म्हणून साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. त्यामुळे आज सोनं खरेदीकडे अनेकांचा कल असतो. या मुहूर्तावर सोन्याने आणि चांदीने आज महागाईची गुढी उभारली आहे. त्यामुळे तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर तपासून घ्या.
सोन्याने या शनिवार-रविवारी यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले. गेल्या महिन्यात 2 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 58,880 रुपये प्रति तोळा होता. रविवारी 24 कॅरेट सोने 60,470 रुपये तोळा झाले होते. सोने रेकॉर्डवर रेकॉर्ड करत आहे. तर चांदीमधील चमक कायम आहे. 22 मार्च रोजी सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे.
चांदी 100 रुपयांनी घसरली
22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळा वाढ झाली. 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 200 रुपयांची वाढ झाली. आज सकाळी हा भाव 55,150 रुपये आहे. तर रेकॉर्डस्तरावरुन 24 कॅरेट एक तोळा सोने आज स्वस्तात खरेदी करता येईल. आज हा भाव 60,150 रुपये आहे. चांदी किलोमागे 100 रुपयांनी घसरली आहे. चांदीचा भाव 72,100 हजार रुपये किलो आहे. गुडरिटर्न्सने हे ताजा भाव जाहीर केले आहेत. आयबीजेएने अजून भाव अपडेट केलेले नव्हते.
कलाकुसरीच्या दागिन्यांना पसंती
सोने खरेदी करताना सर्वच प्रकारच्या दागिन्यांना मागणी दिसून येत आहे. मुहूर्तावर खरेदी करायची असल्याने अनेक जण जुने दागिने मोड देऊन मंगळसूत्र, अंगठी व इतर दागिने करण्यास पसंती देतात.
कलाकुसरीच्या बारीक सोनपोत, कर्णफुले, गव्हाळ मणी, डिझाईनर पँडल या सोबत पुरुषांच्या सोनसाखळीचा सध्या अधिक ट्रेंड असल्याने त्यांची खरेदी वाढू शकते. अनेक जण आपापल्या बजेटनुसार दागिन्यांची खरेदी करीत असले आणि बजेट नसले तरी किमान एक ग्रॅम सोने तरी खरेदी करून ठेवावे, यावर भर दिला जातो.