चाळीसगाव : पत्नीच्या नावावर शेतजमीन करून देण्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा बु.॥ ग्रामपंचायतीचे तलाठी ज्ञानेश्वर सूर्यभान काळे (वय 50, शिवशक्ती नगर, भडगाव रोड, चाळीसगाव) व कोतवाल किशोर गुलाबराव चव्हाण (वय 37, श्रीकृष्ण नगर, चाळीसगाव) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी एक वाजता बोरखेडा बु.॥ ग्रामपंचायत कार्यालयात रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
बोरखेडा बु.॥ गावातील 42 वर्षीय तक्रारदाराच्या वडिलांनी मृत्यूपत्र केले असून त्यानुसार तक्रारदाराच्या नावे बोरखेडा बु.॥ येथील शेतजमीन करण्यात आली असून त्यांच्या हिश्यावर एकूण तीन गट वाटणीस आलेले आहेत. तीन गटांपैकी 64/2 ही शेतजमीन तक्रारदार यांना त्यांची पत्नी प्रतिभा पाटील यांच्या नावावर करायची होती जेणेकरून ते अल्पभूधारक म्हणून गणले जातील. यास्तव त्यांनी नोव्हेंबर-2021 मध्ये तलाठी काळे यांच्याकडे प्रकरण सादर केले होते. त्यावेळी काळे यांनी सात हजार रुपये लाच स्वीकारली होती.
तलाठी कार्यालयात रचला सापळा
त्यानंतरही त्यांनी काम केले नसल्याने तक्रारदाराने 9 फेब्रुवारी रोजी तलाठी कार्यालयात भेट घेतल्यानंतर सुरूवातीला सात हजारांची मागणी केली व त्यात पाच हजार रुपये देण्यावर तडजोड झाल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. गुरुवारी दुपारी एक वाजता तलाठी कार्यालयात तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच तलाठी व कोतवाल यांना अटक करण्यात आली. संशयीतांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.