मुंबई : शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली आली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून माहिती दिली आहे.
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर 40 पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर, लोकसभेतील 18 पैकी 13 खासदारही शिंदे गटात सामिल झाले. त्यामुळे, शिंदे गटाकडून संसदेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. आता, खासदार संजय राऊत यांची शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली असून, त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काय म्हटलंय पत्रात?
एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र दिलं असून यामध्ये असं म्हटलं की, “21 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईत शिवसेनेच्या कार्यकारिणीची एक बैठक पार पडली. या बैठकीत एकमतानं ठराव करण्यात आला की, संजय राऊत हे यापुढं संसदेतील मुख्य नेते नसतील तर गजानन किर्तीकर असतील. आता आमची संख्या जास्त असल्यानं संजय राऊतांची हाकालपट्टी करण्यात यावी.
किर्तीकरांच्या प्रवेशामुळे ठाकरेंना धक्का
मागील काही दिवसापूर्वीच शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर असताना किर्तीकर यांनी शिंदे यांना दिलेला पाठिंबा हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.