सांगली : यावर्षी प्रथमच सांगलीत महिलांसाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्राला पहिली महिला महाराष्ट्र केसरी मिळाली आहे. सांगलीची प्रतीक्षा रामदास बागडी हिने कल्याणच्या वैष्णवी पाटील या महिला मल्लाला चितपट करत पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे. तिला चांदीची मानाची गदा सुपूर्द करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजित पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मिरजेतील जिल्हा क्रीडा संकुल येथे झाली. या कुस्ती स्पर्धेत राज्यभरातून सुमारे 450 कुस्तीगीर सहभागी झाल्या होत्या. आज शुक्रवारी मुख्य लढत झाली. महिला महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना अतिशय थरारक ठरला. कल्याणच्या वैष्णवी पाटीलने सगल 4 गुण मिळत प्रतीक्षावर दबाव आणला. पण शेवटच्या क्षणात प्रतीक्षाने वैष्णवीला चितपट करत 4 गुण मिळवले. त्यामुळे पहिल्या महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा मिळवण्यात प्रतीक्षाला यश आलं.
कोण आहे प्रतीक्षा बागडी?
प्रतीक्षा रामदास बागडी ही 21 वर्षांची असून तिचं वजन 76 किलो इतकं आहे. ती सांगलीच्या तुंग गावची महिला पैलवान आहे. ती सांगली शहरातील यशवंत नगरमधील वसंतदादा कुस्ती केंद्र मध्ये सराव करते. तिला प्रशिक्षक सुनील चंदनशिवे यांच्याकडून मार्गदर्शन केलं जातं. प्रतीचे वडील रामदास बागडी हे पोलीस हवालदार आहेत. प्रतीक्षाने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आतापर्यंत दोन पदकाची कमाई केली आहे. ती ढाक, टांग मारणे डावात तरबेज आहे.