नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सरकारने मोठी बातमी दिली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. DA आणि DR मधील ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू होईल.
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाला आहे. वाढीव दर जानेवारी 2023 पासून लागू होईल. यासोबतच कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही थकबाकी मिळणार आहे. या घोषणेमुळे सरकारवर दरवर्षी 12,815 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयाचा सुमारे 47.58 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 69.76 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनंतर डीएमध्ये ही वाढ करण्यात आली आहे.
पगार किती वाढणार?
पगाराच्या बाबतीत, जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18000 रुपये असेल, तर 38 टक्क्यांनुसार, 6,840 रुपये महागाई भत्ता दिला जातो. त्याच वेळी, डीए 42 टक्के झाल्यानंतर कर्मचार्यांचा डीए 7,560 रुपये होईल. जर आपण कमाल मूळ वेतन बघितले तर 56,000 रुपयांच्या आधारे महागाई भत्ता 21,280 रुपये होतो. आता त्यात चार टक्क्यांच्या वाढीनुसार बघितले तर तो 23,520 रुपयांवर जाईल. या प्रकरणात, किमान मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा 720 रुपये आणि वार्षिक 8,640 रुपये लाभ मिळतील.
डीएमध्ये गेल्या वेळी इतकी वाढ झाली होती
केंद्र सरकार दरवर्षी जानेवारीच्या सुरुवातीपासून ते जुलैच्या अखेरीस DA/DR वाढवते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विलंब होत आहे. गेल्या सहामाहीत केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली होती. यानंतर कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्क्यांवरून 38 टक्के करण्यात आला.