मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलची चर्चा सुरू आहे. तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला जातो. तिचं नृत्य अश्लील असल्याचं म्हटलं जातं. काही दिवसांपूर्वी छुप्या पद्धतीने तिचा व्हिडिओ काढल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. आता प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटीलवर निशाणा साधला आहे. इंदुरीकर महाराज यांनी आपल्या खास शैलीत गौतमी पाटीलचा समाचार घेतला आहे.
गौतमी कार्यक्रमांसाठी मानधन लाखांमध्ये घेते. तिच्या कार्यक्रमांना खूप गर्दी होते. याच सर्व मुद्द्यांवरून इंदुरीकर महाराज यांनी गौतमीवर टीका केली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तवलवाडी इथे एका महोत्सवात इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. याठिकाणी त्यांनी नाव न घेता गौतमी पाटीलला टोला लगावला. गौतमी पाटीलचे उदाहरण देत समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर इंदुरीकर महाराजांनी लक्ष वेधले.
आम्ही 5 हजार मागितले तर पैशांचा बाजार…
गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख मोजण्याची तयारी असते पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही. आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो. मात्र गौतमीने तीन गाणे वाजविले की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, राडा तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधे संरक्षणही दिले जात नाही, या शब्दांत इंदुरीकर महाराजांनी खंत व्यक्त केली.
कोण आहे गौतमी पाटील?
26 वर्षीय गौतमी ही डान्सर असून लावणी डान्सर म्हणून तिला ओळखलं जातं. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हणजे गर्दी आणि राडा हे जणू समीकरण बनले आहे. आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याने गौतमीवर प्रचंड टीका झाली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांतून तिला नृत्याच्यासाठी बोलवले जाते. यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर तिचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात.