जळगाव : तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर ऑईल टँकरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुण ठार झाल्याची घटना रविवारी २६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
संदिप मानसिंग शिरसाम (वय-२४) आणि वसंत मुन्ना वरखेडे (वय-२८ दोन्ही.मुळ रा.धमण्या.जि.बैतूल, मध्यप्रदेश) असे मयत तरुणांचे नाव आहे. दोघेही मयत एमआयडीसी परिसरातील चटई कारखान्यात कामाला होते. जळगाव येथून भुसावळ येथे दोन तरुण दुचाकी क्रमांक (एमपी ४८ एमआर ५३९७) वरून रविवारी २६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जात होते. नशिराबाद गावाजवळ भरधाव वेगाने येणारे आईल टँकर (एमएच ०४ डीएस २२१७) ने दुचाकिस जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झालेत.
पोलिसांची घटनास्थळी धाव
अपघात घडल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तरुणांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे हलविण्यात आले आहे. नशिराबाद पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.