जळगाव: सध्याचे सरकार हे निवडणुकांना घाबरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व निवडणुका जास्तीत जास्त पुढे कशा ढकलता येतील, याचाच प्रयत्न सुरू आहे. मात्र राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुरु असलेल्या सुनावनीनंतर सुप्रीम कोर्टाचा योग्य निकाल आल्यास राज्य सरकार कोसळू शकते, परंतु मध्यावधी निवडणुकाऐवजी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता अधिक आहे, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी पाचोरा येथे पत्रकार परिषदेत हा मोठा दावा केला आहे. राज्यातील सद्याच्या परिस्थितीबाबत बोलतांना जयंत पाटील यांनी शिवसेनेसह भाजपवर टीका केली. ते म्हणाले, राज्यात शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाला कोणतीही किमंत राहिली नाही. मात्र त्यासोबत आता भारतीय जनता पक्षाची किंमत कमी झाली आहे. असंगाशी संग केल्यावर काय होते ते आता भाजपला दिसून आले आहे. आगामी निवडणूकीत जनताही त्यांना दाखवून देईल.
एकनाथ शिंदे भाजपच्या प्रभावाखाली
जयंत पाटील यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांचाही समाचार घेतला. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेचे उदाहरण दिले. जयंत पाटील म्हणाले, “एकनाथ शिंदे किती प्रभावाखाली काम करीत आहेत, हे जनतेला दिसून आले आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच खऱ्या अर्थाने मुख्यमंत्रीपदाचे काम करीत आहेत हेच जनतेला दिसून आल्याचे जयंत पाटील म्हणाले.