नवी दिल्ली : दिल्लीत मच्छरांची कॉईल पेटवून झोपल्यानंतर मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एकाच कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्री पार्क परिसरात एक कुटुंब कॉईल पेटवून झोपले होते. त्यानंतर रात्री कधीतरी गादीवर कॉइल पडली, त्यामुळे संपूर्ण खोलीत धूर पसरला आणि तिथे झोपलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी दोन सदस्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्लीचे पोलीस अधिकारी हिमांशू मिश्रा यांनी सांगितले की, सकाळी 9 वाजताच्या सुमारास शास्त्री पार्क पोलीस ठाण्यात कॉल आला की शास्त्री पार्कमधील मच्छी मार्केटमध्ये एका घराला आग लागली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना जगप्रवेश चंद्र रुग्णालयात दाखल केले. या घटनेत 9 जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
विषारी धुरामुळे झाला मृत्यू
पोलिसांना त्यांच्या प्राथमिक तपासात असे आढळून आले की, रात्री कधीतरी एका गादीवर एक जळणारी कॉइल पडली होती, ज्यामुळे आग भडकून विषारी धूर संपूर्ण खोलीत पसरला आणि तेथे झोपलेले लोक बेशुद्ध पडले. नंतर त्याचा गुदमरून मृत्यू झाला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याचवेळी अग्निशमन दलालाही घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी घरातील आग विझवली आहे.
दीड वर्षाच्या मुलाचाही मृत्यू झाला
या घटनेत भाजल्याने आणि गुदमरल्याने 6 जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतांमध्ये 4 पुरुष, 1 महिला आणि दीड वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. त्याचबरोबर आगीत गंभीररीत्या भाजलेल्या दोघांवर उपचार सुरू आहेत. जळालेल्यांमध्ये 15 वर्षीय तरुणी आणि 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय सुमारे 22 वर्षांच्या तरुणाला प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजमत, हमजा, जाहिदा, दानिश, निशाद आणि फैजुल यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय सोनी आणि जियारुल यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कॉइल पेटवून झोपणे धोकादायक
डासांपासून बचाव करणाऱ्या कॉइलमध्ये डीडीटी, इतर कार्बन फॉस्फरस आणि घातक पदार्थ असतात. मच्छर कॉइल पेटवून बंद खोलीत झोपल्याने खोलीतील गॅस बाहेर पडू देत नाही. कॉइल जळत राहिल्याने कार्बन मोनोऑक्साइड संपूर्ण खोलीत भरते. खोलीतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. हळूहळू, कार्बन मोनॉक्साईड व्यक्तीच्या शरीरात जातो, ज्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होतो आणि गुदमरल्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो. एका संशोधनानुसार, एक कॉइल 100 सिगारेट्सइतकी धोकादायक आहे. त्यातून सुमारे पीएम 2.5 धूर निघतो, तो शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतो.