पुणे : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. यावरून आता शिरसाट यांच्या अडचणी वाढल्या असून, सुषमा अंधारे यांनी आमदार शिरसाट यांच्याविरोधात तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुषमा अंधारे यांच्यावतीने आज हा दावा दाखल केला आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात बोलताना आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करीत ‘ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत; पण त्या बाईने काय- काय लफडी केली आहेत, तिलाच माहीत,’ असे वक्तव्य केले होते. त्यानंतर सुषमा अंधारे आज अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
महिला आयोगाकडून कारवाईला सुरुवात
महिला आयोगाने शिरसाट यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. जोपर्यंत शिरसाटांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका सुषमा अंधारे यांनी घेतली आहे. आयोगाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांकडून शिरसाट यांचे व्हिडीओ मागवले असून, त्यांचे वक्तव्य तपासून पुढचे निर्देश देण्यात येतील.