जळगाव : आग्रा येथे केळी पोहोचवण्यासाठी निघालेल्या ट्रक मालकासह चालकाने इच्छित स्थळी मालाची डिलेव्हरी न करता परस्पर केळी विक्री करून सावद्यातील ट्रान्सपोर्ट व्यावसायीकाला पाच लाख 41 हजारांचा चुना लावण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सावदा येथील ट्रान्सपोर्ट व्यासायीक शेख शोएब शेख असलम (वय 25) हे केळी खरेदी-विक्रीचे ट्रान्सपोटे व्यावसायीक आहेत. 23 मार्च रोजी रात्री 9 वाजता सावदा गावातून ट्रक क्रमांक (आर.जे.11 जी.ए.8000) मधून 18 टन 750 किलो वजनाची पाच लाख 41 हजार रुपये किंमतीची केळी आग्रा येथे पोहोचवण्यासाठी ट्रक चालक बल्लू सुंदर कुरेशी (फतेहाबाद) आणि हरीओम जोरावरसिंग (आग्रा, उत्तर प्रदेश) हे निघाले मात्र त्यांनी केळी संबंधित ठिकाणी डिलेव्हरी न करता परस्पर कुठेतरी विकली.
दोघांविरोधात गुन्हा…
आग्रा येथे केळी पोहोचली नसल्याने व्यावसायीकाने ट्रक चालक व मालकाशी संपर्क साधला मात्र संपर्क होत नसल्याने व आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने शेख शोएब शेख अस्लम यांनी आता सावदा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अनवर तडवी करीत आहे.