जळगाव : जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा मोठा दबदबा राहिला आहे. त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत, राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. यामुळे भाजपला पुन्हा नव्याने संघटनात्मक बदल करावे लागणार आहे. आगामी काळात निवडणुका होऊ घातल्या असून, यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यादृष्टीने दोन जिल्हाध्यक्ष निवडीची संकेत नेत्यांनी दिले आहेत. याबाबत दोन दिवसापूर्वी ‘राजमुद्रा’ने बातमी दिली होती. आता महानगराध्यक्ष पदाचे देखील बदल करण्यात येणार आहे. महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून यामध्ये सर्वात आघाडीवर नाव अश्विन सोनवणे यांचे चर्चेला जात आहे. अश्विन सोनवणे हे पूर्वीपासूनच भाजपमध्ये आहे. अद्यापपर्यंत त्यांनी कुठलाही पक्ष बदललेला नाही. भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापनेनंतर जळगाव शहरातही मोठा बदल झाल्याचे दिसून आले. काही नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र, डॉ. अश्विन सोनवणे यांना अनेक राजकीय ऑफर्स आल्यावर देखील त्यांनी भाजपला अद्याप पर्यंत सोडचिट्टी दिलेली नाही. अश्विन सोनवणे यांनी भाजपमध्येच कायम राहून एकनिष्ठता दाखवली आहे. यामुळे त्यांचा नावाचा विचार पक्षश्रेष्ठी करू शकतात अशी सध्या परिस्थिती आहे. त्यांना जर महानगर अध्यक्षपद दिले तर तुल्यबळत असलेल्या कोळी समाजाला देखील भाजपाला व्यासपीठ देता येणार आहे. त्यामुळे कोळी समाज भाजपाचच्या मुख्य प्रवाहात येणार आहे. अश्विन सोनवणे हे सातत्याने भाजपच्या गेली अनेक वर्ष सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून येत आहे. असे असताना आरोग्य क्षेत्रात देखील त्यांचे कार्य आहे. स्वतः डॉक्टरकी पेशी असल्याकारणाने राजकीय व समाजकारणात आरोग्याच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू असते. भाजपमधून त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
दीपक सूर्यवंशींना पुन्हा संधी?
विद्यमान महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांचा कार्यकाल देखील भाजपसाठी यशस्वी राहिला आहे. त्यांच्या कार्यकाळात जळगाव महापालिका निवडणुका असतील अथवा बंडखोरी झाल्यानंतर नगरसेवकांमध्ये समन्वय ठेवून योग्य ते निर्णय देणे या तसेच संघटनात्मक वारसा ही त्यांची जमेची बाजू आहे. आमदार सुरेश भोळे यांचे निकटवर्तीय असल्याचे त्यांची ओळख आहे. त्यामुळे पक्ष त्यांना कायम ठेवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पदासाठी इच्छुकांची शर्यत
राज्यात भाजपची सत्ता असल्याने भाजप महानगराध्यक्ष होण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून आहे. यासाठी अनेकांनी वरिष्ठ नेत्यांची संपर्क साधणे सुरू केले आहे. पद मागायची नाही मात्र कोणत्या ना कोणत्या निमित्ताने नेत्यांशी ऋणानुबंध घट करण्याचे प्रयत्न चालले आहे. नेत्यांच्या विश्वासातील होण्यासाठी अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच शहरात विविध सण उत्सवाच्या मुहूर्तावर डिजिटल बॅनर देखील लावण्याचा घाट बांधत आहे. यामुळे चर्चेत का होईना? महानगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत नाव चर्चेत आले पाहिजे जेणेकरून नेत्यांकडून शब्द सोडवत आहे असे प्रयत्न अनेकांचे चालले आहेत. मात्र भाजपमधील पक्षश्रेष्ठी खास करून मंत्री गिरीश महाजन नेमका काय निर्णय घेतात व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून कोणाला पसंती दिली जाते हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.