श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील आरएसएसच्या केंद्रीय नेत्यांना ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने मंगळवारी धमकी दिली आहे. रेझिस्टन्स फ्रंटने 30 नेत्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. आम्ही या नेत्यांचे रक्त सांडू, अशी धमकी देण्यात आल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी 1 एप्रिल रोजी केलेल्या वक्तव्यानंतर दहशतवादी गटाची ही धमकी आली आहे.
अखंड भारत म्हणजे अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि तिबेट हे सत्य असल्याचे भागवत म्हणाले होते. विभाजित भारत हे एक वाईट स्वप्न आहे. हा 1947 पूर्वीचा भारत होता. जिद्दीमुळे जे भारतापासून वेगळे झाले, ते सुखी आहेत का? ते आज दु:खात आहेत. भारतामध्ये सुख आहे, असे मोहन भागवत म्हणाले होते.
जम्मू-काश्मीरमधील सक्रिय रेझिस्टन्स फ्रंट ही लश्कर-ए-तैयबाची शाखा आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या विरोधात ही फ्रंट ऑनलाइन मोहीमही चालवते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या फ्रंटने कराचीतील या ऑनलाइन मोहिमेच्या 6 महिन्यांनंतरच आपली संघटना तयार केली. ही तेहरिक-ए-मिल्लत इस्लामिया आणि गझनवी हिंद या इतर संघटनांसारखीच आहे. 2022 मध्ये मारले गेलेले बहुतेक दहशतवादी हे रेझिस्टन्स फ्रंट किंवा लश्करचे होते. त्यांची संख्या 108 होती.