जळगाव : सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी चार हजारांची लाच मागून ती स्वीकारताना खिरोदा (ता. रावेर) येथील तलाठ्यासह कोतवालास जळगाव एसीबीने रंगेहाथ अटक केल्याने महसूल यंत्रणेतील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रल्हाद प्रमोद प्रल्हाद न्यायदे (खिरोदा) असे अटकेतील तलाठ्याचे तर शांताराम यादव कोळी असे कोतवालाचे नाव आहे.
तक्रारदार यांची वडीलोपार्जीत शेती खिरोदा (ता. रावेर) तलाठी कार्यालयाच्या हद्दीत आहे. तक्रारदार यांचे मोठे भाऊ मयत झालेले असल्याने सदर शेत जमीनीचे ७/१२ उताऱ्यावर मयत भावाची पत्नी व मुलगा यांचे नावे वारस म्हणून नोंद करायची होती. मात्र, नोंद घेण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे पंचासमक्ष तलाठी प्रल्हाद न्यायदे आणि कोतवाल कोळी यांनी ४ हजार रुपये लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम खिरोदा तलाठी कार्यालय येथे स्विकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहात अटक केली. याबाबत सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. जळगाव एसीबीचे पोलिस अधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, ईश्वर धनगर, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.