मुंबई : राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. राज्यातील कोतवालांचे मानधन आता 7 हजार 500 वरून 15 हजार होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.
राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च 2023 रोजी राज्याचा सन 2023-24 अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली होती. अर्थसंकल्पीय भाषणाच्यावेळी केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीच्या सादर केलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने दिनांक 17 मार्च, 2023 च्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. शासन मान्यतेनुसार सध्या सेवा कालावधीनुसार कोतवालांना मिळत असलेले मानधन 7 हजार 500 रुपयावरून 15 हजार करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व 12,793 कोतवालांना यापुढे दरमहा सरसकट 15 हजार इतके मानधन लागू करण्यात आले आहे. हे मानधन 1 एप्रिल 2023 पासून अनुज्ञेय असणार आहे.
महसूल विभागातील महत्वाचा घटक
राज्याच्या महसूल विभागातील महत्त्वाचा घटक म्हणून कोतवालांकडे पाहिले जाते. गावातील प्रत्येक घरांची अचूक माहिती असल्यामुळे त्यांना गावातील महसूल गोळा करणे व टपाल वाटप करणे सोयीचे जाते. चौथी उत्तीर्ण ही या पदाची पात्रता असून तुटपुंज्या पगारावर काम करीत असताना सुद्धा प्रामाणिकपणे काम करणारे महसूल विभागातील एकमेव पद म्हणजे ‘कोतवाल’ असे म्हणता येईल. कारण अपुऱ्या मानधनावर काम करणारी व्यक्ती असली तरी शासकीय कामकाजामध्ये सरकारी साक्षीदार म्हणून फार मोठी भूमिका बजावत असतात.