पुणे : पुण्यात देशविदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, त्यामुळे विद्येचं माहेरघर अशी पुण्याची ओळख आहे. या शहरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी राहतात. मात्र, आता हे विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकताहेत की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. शाळेपासून ते महाविद्यालयांमध्ये होणार अंमली पदार्थाच सेवन हा चिंतेचा विषय आहे. त्यात अगदी भारतात उपलब्ध नसणाऱ्या कॅथा इडूलिस काट या अंमली पदार्थाचही सेवन होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. आफ्रिकेत आढळणाऱ्या अंमली पदार्थाच्या वनस्पतीपासून तयार केलेली दीड लाखांची पावडर जप्त करण्यात आली आहे. पुण्याच्या गुन्हे शाखेने राज्यातील पहिली कॅथा इडूलिस काटची कारवाई केली आहे.
कशी असते कॅथा इडूलिस वनस्पती
कॅथा इडूलिस काट ही वनस्पती प्रामुख्याने अरेबियन देशांमध्ये कमी पाण्याच्या भागात घेतली जाते. ही वनस्पती सदाहरीत प्रकारातील आहे. हॉर्न ऑफ आफ्रिका आणि अरेबियन दीपकल्पातील मूळ कडू चवीची पाने आणि कोवळ्या कळ्या कॅथिनोन आणि कॅथिन या उत्तेजक घटकांसाठी चघळल्या जातात, ज्यामुळे सौम्य उत्साह निर्माण होतो. युरोप, युनायटेड स्टेट्स आणि चीनमध्ये ही वनस्पती आणि कॅथिनॉन हे नियंत्रित पदार्थ मानले जातात.
ड्रग्ज तस्करीत विदेशी व्यक्तींचा सहभाग
पुण्यात नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पुणे व परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. यासाठी कामगार वर्गदेखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहतो. त्यामुळे अमली पदार्थ तस्करांना एलएसडी, कोकेन, एमडी, चरस, ब्राउन शुगरपासून ते थेट गांजा, अफूची बोंडे चुरा यासारख्यांना ग्राहक मिळतो. कोकेन, ब्राउन शुगर विक्रीत नायजेरियाच्या व्यक्तींचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे.