जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेने बँकेतील खाते सील केल्यानंतर गाळेधारकांकडे पथकांनी वसुलीसाठी तगादा लावला आहे. सुमारे २२० कोटी रुपये वसूल करायचे असल्याने ॲक्शन मोडमध्ये येत पालिकेने दोन दिवसांची मुदत दिली आहे. गुरुवारपर्यंत थकबाकीची रक्कम न भरल्यास थकबाकीदारांच्या गाळ्यांवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता वर्तविली आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या व्यापारी संकुलांमधील वर्षाकाठी मिळणारा लाखो रुपयांचा महसूल ठप्प पडला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या दौर्यात राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी पर्याय सुचवले आहेत. यात थकीत रकमेच्या वसुलीबरोबर उत्पन्नाचे नवीन स्रोत शोध घेण्याचा सल्ला दिला आहे. पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांकडे गेल्या नऊ वर्षात २२० कोटी रुपये घेणे आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने १२ बँकांमधील गाळेधारकांचे बँक खाते सील करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.