जळगाव : प्रतिनिधी
येथील वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या वतीने द्विदशकपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सवाचे 6 ते 9 जानेवारी दरम्यान आयोजन केले आहे. छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात गुरुवारी सायंकाळी 7 वाजता कथ्थक व भरतनाट्यम कलावंतांच्या जुगलबंदीने महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. पहिल्या दिवशी सायंकाळी मानसी मोदी व मानसी करानी भरतनाट्यम व कथ्थक नृत्याची जुगलबंदी रंगणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची वेळ सायंकाळी 7 ते 10 असणार असून, कोविड 19 या महामारीच्या शासकीय नियमनांच्या अधीन राहून रसिकांना मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशद्वारावर तापमान नोंद व सॅनिटाइज केले जाणार आहेत. त्यामुळे रसिकांनी 6.30 वाजता प्रवेश घेणे अपेक्षित आहे.
मानसी मोदी : या राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंत आहेत. पद्मभूषण कुमोदिनी लाखिया यांच्या त्या शिष्या आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक उत्तमोत्तम नृत्याच्या अनेक कार्यक्रमात सहभागी होऊन परदेशात भारताचे प्रतिनिधित्व केले. अहमदाबाद येथील शाळेत विद्यादानाचे कार्य करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत रसिया, पॅरिस, इटली, मॉरिशस, मुंबई, अलवास नॅशनल लोकनृत्य महोत्सव, गुजरात विद्यापीठाचा महोत्सवात सादरीकरण केलेले आहे. त्या कथ्थक विषय घेऊन नेट परीक्षा देत आहेत.
मानसी करानी : या भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यात पदवीधर आहेत. चेन्नई येथील अनिल गुहा यांच्याकडून त्यांनी भरतनाट्यम नृत्याचे प्रशिक्षण घेतले. पद्मभूषण डॉ.कनक रेळे यांच्या विविध नृत्य सादरीकरणामध्ये मानसीचा सक्रिय सहभाग असतो. एक्सपरिमेंटल थिएटर, तिरुपती बालाजी मंदिर, रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे सादरीकरण केलेले आहे. कृष्ण गान सभा, नारद गान सभा, भारती विद्या भवन, गीता महात्म्य तसेच धाऊली कालिंगाना संगीत महोत्सव ओडिशा येथेही सादरीकरण केले. भारतभरात त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले.