मुंबई राजमुद्रा दर्पण|मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्याचबरोबर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सभांमुळे राजकीय वातावरण फणफणले होते. दोन्ही सभांमधून प्रामुख्याने शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र फिरवण्यात आले होते.
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवसेनेतर्फे शनिवार, 14 मे रोजी बी.के.सी मैदानावर महाविराट सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेसाठी मुंबईतील सर्व शिवसेना पदाधिकारी अफाट मेहनत घेत असून, शिवसेनेत नाराज असलेले नेते, पदाधिकारी यांनाही या सभेचे निमंत्रण पाठविण्यात येत आहे. शिवसेनेचा वाघ आणि ज्यांच्या भाषणांमुळे मैदान गाजायचे ते शिवसेना नेते रामदास कदम सध्या शिवसेनेवर नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. शनिवारी होणाऱ्या जाहीर सभेचे निमंत्रण, खुद्द मुख्यमंत्री यांनी रामदास कदम यांना पाठवले आहे.परंतु, या सभेला उपस्थित राहू शकणार नसल्याचे रामदास कदम यांनी पक्षप्रमुखांना कळले.काही दिवसांपूर्वीच रामदास कदम यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी राऊत यांना ‘जागर कदम वंशाचा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण दिले होते.
त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कदम यांना जाहीर सभेला येण्याचे निमंत्रण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत दिले. अनिल परब प्रकरणापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रामदास कदम यांच्यावर नाराज होते. मात्र कदम यांना निमंत्रण पाठवून ठाकरे यांनी दिलजमाईचा एक प्रयत्न केल्याचे दृश्य दिसून आले.मात्र, रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांचे हे निमंत्रण स्वीकारले नाही. गावात देवळाचा सप्ताह कार्यक्रम असल्यामुळे आपण सभेला उपस्थित राहणार नाही, मी जिवंत असेपर्यत भगव्याची साथ सोडणार नाही. गावातील देवळाचा सप्ताह कार्यक्रम संपल्यानंतर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे.