जळगाव राजमुद्रा दर्पण| प्लास्टिक बंद नियमाचे पालन न करणा-यांवर महापालिकेतर्फे बेधडक कारवाई करण्यात आली. एमआयडीसीत कंपनीतील ३ टन प्लास्टिक सह संपूर्ण शहरातून एकूण ६ टन प्लास्टिक जप्त करून कारवाई करण्यात आली.
आयुक्त विद्या गायकवाड यांनी प्लास्टिक बंदी अधिनियमाचे पालन न करणारे निर्माते, वितरक व किरकोळ विक्रेते यांच्यावर धडक कारवाई करत आज त्यांनी प्लास्टिक बंदी अधिनियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथके तयार करून जप्तीची कारवाईच्या सूचना दिल्या. आरोग्य विभागाचे उपायुक्त अभिजीत बाविस्कर, महसूल उपआयुक्त प्रशांत पाटील, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर, आरोग्य विभागाचे यु.आर. इंगळे, अग्निशामक विभागाचे शशिकांत बारी अशी पाच पथके तयार करून कारवाई करण्यात आली. या पथकांनी स्वतंत्रपणे एमआयडीसी, फुले मार्केट, बळीराम पेठ, दाणाबाजार, सुभाष चौक व इतर ठिकाणी दंडात्मक कारवाई करत साडेपाच ते सहा टन प्लास्टिक जमा करून पंचावन्न हजार रुपये दंड वसूल केला. यावेळी एमपीसीबीचे चव्हाण, मनीष महाजन आणि मोरे व कारवाई सोबत पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
सकाळी साडेअकरा वाजेपासून महापालिका आणि एम.पी.सी.बी च्या अधिकारी आणि कर्मचारी मिळून मे. प्रभा पॉलीमार व्ही. ११४ एमआयडीसी यांची तपासणी करून अंदाजे ३ टन प्लास्टिक बंद अधिनियमांतर्गत 50 मायक्रोनची परवानगी नसलेली कॅरिबॅग व डी पंच असलेल्या पिशव्या जप्त करून कंपनी मालकावर १० हजारांचा दंड आकारण्यात आला.