मुंबई राजमुद्रा दर्पण | केतकीने शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. आणि आता केतकीविरोधात कळव्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिनं तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर ती ट्रोल होत असून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत केतकीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दरम्यान केतकीला अटक होण्याची शक्यता आहे. केतकी सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव्ह असते. सोशल मीडियावर बेधडकपणे केलेल्या वक्तव्यांमुळे केतकी अनेकदा अडचणीत सापडली आहे. त्यामुळे नेटकरी तिला ट्रोलदेखील करत असतात.
केतकीने आता तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, केतकी चितळेने ही पोस्ट केल्यामुळे पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
केतकीने ही पोस्ट करुन दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे कृत्य केले आहे. शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीने केली असल्याची तक्रार नेटे यांनी कळवा पोलिस ठाण्यात केली आहे. केतकीने पोस्ट मध्ये म्हटले आहे….
तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll…