जळगाव राजमुद्रा दर्पण | नवीन रेल्वे मार्गासाठी जालना ते जळगाव या १७४ कि.मी. अंतराच्या अंतिम भूखंड सर्वेक्षणाला फेब्रुवारीमध्ये निधी मंजूर झाला होता. त्यानंतर सर्वेक्षणाला वेग देण्यात आला. या मार्गाचे सर्वेक्षण भौतिकदृष्ट्या सुरू असून, त्याबरोबरच १४ मे पासून हवाई सर्वेक्षणही केले जात आहे. विमानाद्वारे आगामी ४ दिवसांत हवाई सर्वेक्षण केले जाणार आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी ट्विट करून जालना – जळगाव रेल्वे मार्गाच्या हवाई सर्वेक्षणासंदर्भात माहिती दिली. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत जालना-जळगाव रेल्वे मार्गाचा ‘फायनल लोकेशन सर्वे’ ८ फेब्रुवारी रोजी मंजूर केला गेला होता. या सर्वेक्षणाचे काम भौतिकदृष्ट्या सुरूच आहे. त्याचबरोबर हवाई सर्वेक्षणासाठी अकोला येथे विमान दाखल झाले आहे. या विमानाद्वारे रडारचा वापर करून हवाई सर्वेक्षण केले जाणार आहे. १४ ते १७ मे या ४ दिवसांत हे सर्वेक्षण होणार आहे. हे विमान एका दिवसाला ५० कि. मी. सर्वेक्षण करणार आहे. यामुळे फायनल लोकेशन सर्वेक्षणाला गती मिळेल, असे या ट्वीटमध्ये रावसाहेब दानवे यांनी नमूद केले आहे. सर्वेक्षणासाठी त्यांनी ४.५ कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत.
अंतिम भूखंड सर्वेक्षण झाल्यानंतर मार्गाचा प्रस्ताव हा स्वीकृतीसाठी रेल्वे बोर्डाकडे दिला जाईल.
जालना- जळगाव रेल्वे मार्गामुळे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, व्यापार, शेती, लघुउद्योग, दळणवळण, पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. जालना, पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोडमार्गे, गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, जळगाव असा हा मार्ग जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अजिंठा हे ऐतिहासिक शिल्पकलेचे पर्यटनस्थळ, या रेल्वे मार्गामुळे येथे जगभरातील पर्यटकांसाठी रेल्वे प्रवासाची सोय होणार आहे. मराठवाड्याचे आराध्य दैवत राजूर महागणपती येथून हा रेल्वे मार्ग जात असल्याने या भागातील भाविकांसाठी सोयीचे ठरणार आहे.
या रेल्वे मार्गाचा फायदा पुढे सूरत, गुजरात, राजस्थानच्या रेल्वे गाड्यांना आंध्रप्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठीचा मार्ग म्हणून होणार आहे.