मुंबई राजमुद्रा दर्पण | मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या सभेनंतर आज भाजपची उत्तर सभा देखील मुंबईतच होणार आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सभेचे आयोजित करण्यात आले आहे. या सभेचे आयोजन उत्तर भारतीय युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आले आहे. सायंकाळी साडेपाच वाजता सभेला सुरुवात होणार आहे.
1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भाजपने बुस्टर सभा घेतली होती. आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तोफ पेटणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस जबाब देणार आसून याबाबत त्यांनी ट्विट देखील केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघ आणि भाजपवर जोरदार टीका केली. ही टीका भाजप आणि संघाच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे जोरदार प्रत्युत्तर येणार असे संकेत मिळत होते. आता फडणवीस यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम…अरे छट हा तर निघाला…आणखी एक ‘टोमणे बॉम्ब’… जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा !!! असे म्हणत भाजप जोरदार प्रत्युत्तर देणार याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता विरोधी पक्षनेते या सभेत काय बोलणार याची उत्सुकता आहे.
जवाब मिलेगा !
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मुंबईतील बीकेसीमध्ये जाहीर सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप, हिंदुत्व अशा अनेक मुद्द्यांवर परखड टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या टीकेचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेत प्रत्युत्तर दिले. आता फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत, काल झालेल्या भाषणातून मुख्यमंत्र्यांचे हिंदुत्व खोटे असल्याचे उघड झाल्याचे पूर्ण महाराष्ट्राला कळले असल्याची, टीका सोमय्यांनी केली. त्याचबरोबर ठाकरेंनी मनीलॉंड्रींग केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.