भारत राजमुद्रा दर्पण | सर्वाधिक म्हणजेच 14 वेळा थॉमस कप जिंकणाऱ्या इंडोनेशियाला भारताने अंतिम सामन्यात मात दिली आणि इतिहासाच्या पानावर नाव आपले नाव लिहिले. नेमका हा थॉमस कप आहे तरी काय आणि याला बॅडमिंटन विश्वात इतका मान का आहे, ते पाहूया…
अंदाजे सर्वच भारतीय बलपणापासून बॅडमिंटन हा खेळ खेळतच असतात. अगदी मुलं-मुली दोघंही हा खेळ खेळताना दिसत असतात. पण याच खेळाची एक भव्य स्पर्धा असणाऱ्या थॉमस कपमध्ये मात्र भारताला आजवर विजय मिळवणे तर लांबचे, अंतिम सामन्यातही पोहोचता आले नव्हते. पण यंदा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचत चषकावर भारतीय संघाने नाव कोरले आहे. लक्ष्य सेन, किंदम्बी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीचे तर सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीचे सामने जिंकत भारताला 5 पैकी 3 सामने जिंकवून देत विजय मिळवून दिला आहे. तब्बल 73 वर्षानंतर भारताने उंचावलेला हा थॉमस कप नेमका आहे तरी काय जाणून घेऊ…
अनेक प्रसिद्ध खेळांचा जन्म इंग्लंडमध्येच झाला असून या प्रसिद्ध अशा थॉमस कपची सुरुवातही इंग्लंडच्याच एका खेळाडूने केली. 19 व्या दशकाच्या सुरुवातीस इंग्लंडचे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सर जॉर्ज एलन थॉमस यांनी या स्पर्धेची सुरुवात केली. फुटबॉल या सर्वात जुन्या खेळाची ज्याप्रमाणे विश्वचषक स्पर्धा होत होती, तशीच स्पर्धा बॅडमिंटनची देखील व्हावी असाच थॉमस यांना निर्धार असावा. त्या अनुषंघाने या स्पर्धेची सुरुवात झाली. 1948-49 मध्ये सर्वात आधी ही स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवली गेली. आधी दर तीन वर्षांनी होणारी ही स्पर्धा नंतर मात्र दर दोन वर्षांनी होऊ लागली. 1982 साली स्पर्धेच्या नियमांत झालेल्या बदलानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
आतापर्यंत सर्वाधिक 14 वेळा इंडोनेशियाने, 10 वेळा चीनने, मलेशियाने 5 वेळा तर जपान आणि डेन्मार्क यांनी एक-एक वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ज्यानंतर यंदा 2022 साली भारताने या स्पर्धेत चॅम्पियन इंडोनेशियाला मात देत पाहिले चषक मिळवले आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकणारा भारत हा जगातील सहावा देश बनला आहे. सुरूवातीपासूनच भारतीय बॅडमिंटन संघाची तयारी जोरदार सुरू होती. त्यांनी आधी डेन्मार्कला सेमीफायनलमध्ये मात दिली आणि नंतर अंतिम सामन्यात इंडोनेशियाला सुरुवातीच्या तीन सामन्यात मात दिली. आणि विजय पटकावला…