आसाम राजमुद्रा दर्पण | आसाममध्ये दिमा हासाओ जिल्ह्यात दरड कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री बुलेटिननुसार समोर आली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) शनिवारी रात्री जारी केलेल्या बुलेटिननुसार, दिमा हासाओच्या हाफलांग क्षेत्रात एका महिलेसह तीन जणांना आपला जीव गमवावा लागला.
राज्याच्या इतर भागांशी रेल्वे आणि रस्त्यांचा संपर्क खंडित झाल्यामुळे अनेक ठिकाणी अचानक पूर आणि भूस्खलनामुळे डोंगरी जिल्ह्याला फटका बसला आहे. एएसडीएमएने सांगितले की, न्यू कुंजांग, फ्यांगपुई, मौलहोई, नामजुरांग, दक्षिण बागेतर, महादेव टिला, कालीबारी, उत्तर बागेतर, सीऑन आणि लोदी पांगमौल या गावांमध्ये भूस्खलनाची नोंद झाली आहे. येथील सुमारे 80 घरे बाधित झाली आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, जटिंगा-हरणगाजाव आणि माहूर-फाइडिंग येथील रेल्वे मार्ग भूस्खलनामुळे विस्कळीत झाला.
गेरेमलांब्रा गावातील मायबांग बोगद्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी दरड कोसळल्याने रस्ता बंद झाल्याची शक्यता आहे. ASDMA ने सांगितले की, आसाममधील पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे 25,000 लोक पुरामुळे संकटात आले आहेत. याचा सर्वाधिक फटका कचर क्षेत्राला बसला आहे, ज्यामध्ये 21,000 हून अधिक लोकांचे नुकसान झाले आहेत. दोन जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या एकूण दहा मदत छावण्या आणि वितरण केंद्रांमध्ये किमान 227 लोक आश्रय घेत आहेत.
लष्कर, निमलष्करी दल, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), नागरी प्रशासन आणि प्रशिक्षित स्वयंसेवकांनी कचर आणि होजई जिल्ह्यांमधून सुमारे 2,200 लोकांना वाचवले. दुसरीकडे गुवाहाटीच्या विविध भागांमधून पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. ASDMA ने कचर, करीमगंज, धेमाजी, मोरीगाव आणि नागाव जिल्ह्यांसाठी पुढील 12-72 तासांसाठी पुराचा इशारा दिला आहे.