जळगाव राजमुद्रा दर्पण | शिवाजीनगरातील पुलाच्या कामाची चालढकल सुरूच आहे, शिवाजीनगरातील लाकूड पेठ ते ममुराबाद रस्त्याला जोडणाऱ्या पुलाचे काम करण्यासाठी पुलाच्या मक्तेदाराने आता रस्त्याचे काम करण्यास नकार दिल्याने, आता पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम करण्यास अडचण आली आहे. मनपा प्रशासनही हतबल झाले आहे. त्यामुळे आता पावसाळ्यातही नागरिकांना खड्डयाशी सामना करावा लागणार आहे.
शिवाजीनगर पुलाचे काम गेले तीनवर्षे रखडले आहे, तो नक्की केव्हा पूर्ण होणार हे आता प्रशासन, मक्तेदारही सांगू शकत नाही. मात्र दुसरीकडे या पुलाच्या मार्गाला पर्याय असलेल्या शिवाजीनगर लाकूड पेठ, शिवाजीनगर चौक, टी. टी. साळुंखे चौकमार्गेममुराबाद रस्त्याला जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावरून आता मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. अगदी चोपडा, यावल, रावेर या मार्गाची अवजड वाहतूक या रस्त्यावरून होत आहे. त्यामुळे या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. रस्त्यावर आता केवळ खड्डेच आहे, त्याला रस्ता म्हणण्याची आता गरज नाही. या खड्डयातून वाहतूक करणे आता कठीण झाले आहे.
पुलाच्या मक्तेदाराकडे दुरुस्तीचे काम शिवाजीनगर पुलाचे काम सुरू असल्यामुळे पुलाला पर्यायी असलेल्या मार्गाचे काम महामार्ग विभागाकडे आहे. त्यामुळे शिवाजीनगरातील या रस्त्याचे व पत्र्या हनुमान मंदिरासमोरील अंडरपास रस्त्याचे काम पुलाच्या मक्तेदाराकडे होते, त्यांना केवळ महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लेखी पत्र हवे होते. ते पत्रही मक्तेदारास देण्यात आल्याचे महामार्ग विभागाने सांगितले. परंतु आता पुलाच्या मक्तेदाराने आपण प्रथम पुलाच्या कामाकडे लक्ष देणार आहोत, असे सांगून रस्त्याचे काम करण्यास नकार दिला आहे.
शिवाजीनगर पुलाचे काम आमदार किंवा शासनाकडून आलेल्या निधीतून करण्यात येणार होते. मात्र शिवाजीनगर पुलाच्या कामाचे दहा कोटी रूपये महामार्ग विभागाकडे पडून आहेत त्यातून हा रस्ता करण्यात येणार होता. परंतु आता मक्तेदाराने नकार दिल्यामुळे महापालिकेकडे कोणताही निधी शिल्लक नसल्यामुळे काम कोणत्या निधीतून करायचे अस प्रश्न निर्माण झाला आहे. आणि निधी मिळाला तरी निविदा तसेच इतर प्रक्रिया करण्यात वेळ जाणार आहे.
शिवाजीनगर रस्त्याचे काम पुलाच्या निधीतून होणार होते. मात्र आता मक्तेदाराने पुलाच्या कामास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे निधीतून काम करण्यासाठी निविदा प्रक्रीया करण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे आता पावसाळ्यानंतरच रस्त्याचे काम होईल. मात्र त्या पूर्वी रस्त्यासाठी निधी व निविदा प्रक्रीया पूर्ण करण्यात येईल. असे महापालिका शिवसेनेचे गटनेते नितीन लढढा यांनी सांगितले.
पावसाळ्यापूर्वी हा रस्ता होणे आता शक्य होणार नाही. त्यामुळे शिवाजीनगरातील हा रस्ताही पुलाच्य मक्तेदारामुळे अडकला असून नागरिकांना मात्र ऐन पावसाळ्यात खड्डयातून मार्ग काढत हाल सहन करावे लागणार आहेत.