मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (ता ३०) रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधताना लॉकडाउन १५ दिवसांसाठी वाढत असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर भाजपाने काही मुद्द्यांवर बोट ठेवत मुख्यमंत्र्यांना सवाल केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हवरून भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत टोला लगावला. केशव उपाध्ये यांनी कोकणातील चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीपासून ते दहावी-बारावीच्या परीक्षा आणि लसीकरणापर्यंत विविध मुद्दे उपस्थित करत काही सवाल केले आहेत.
“नेहमी प्रमाणे फेसबुक लाईव्ह म्हणजे कोरड्या गप्पा. ना दिलासा ना विचार किमान उत्तर हवी होती. गेल्या वर्षी निसर्ग वादळाची मदत मिळाली नाही तर यंदाच्या वादळाची मदत कधी मिळणार?, महिनाभरापूर्वी जाहीर केलेल पॅकेज अजून अनेकांना मिळाले नाही ते कधी मिळणार? राज्याने महिना भरात लस विकत का घेतली नाही?, शिक्षणात क्रांतीकारण निर्णय घेणे गरजेचे म्हणजे परीक्षा न घेणे का?, अर्थचक्र कधी फिरणार?, ‘माझं गाव कोरोनामुक्त’ हे जनतेने करायचं तर मग आपण काय करणार?,” असे सवाल केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीचा वेग मंदावत असून, रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. पण, अजूनही दैनंदिन रुग्णसंख्येत दिलासादायक अशी घट झाल्याचं दिसत नाहीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हद्वारे जनसंवाद साधत, परिस्थिती नियंत्रणात येत असली, तरी पहिल्या लाटेच्या समान आहे. त्यामुळे लॉकडाउन १५ दिवसांसाठी वाढवत असल्याची घोषणा केली.