मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | मुंबई येथील आकुर्ली मेट्रो चाचणीला मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली आहे. सकाळपासून या कामाचे नियोजन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसत असताना, मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या चाचणीला सुरुवात केली असता आकुर्ली स्टेशनच्या बाहेर भाजप नेते अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात काळे झेंडे दाखवून मेट्रो चाचणी विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ या दोन मार्गांच्या चाचणीचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महापौर किशोर पेडणेकर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे बरेच नेते उपस्थित होते. या चाचणी विरोधात भाजप नेत्यांकडून विरोध दर्शवत आकुर्ली स्टेशन बाहेर आंदोलन करण्यात आले.
आकुर्ली स्टेशनबाहेर भाजप नेत्यांचा या कामाला विरोध दर्शवण्यात येत असून आंदोलन करण्यात येत आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी या मुख्यमंत्र्यांच्या कामाचा विरोध दर्शवत सांगितले की “मुख्यमंत्र्यांनी आज होणाऱ्या ट्रायल रनचे उद्घाटन केले आहे; मात्र आजच्या मेट्रोच्या कामाचा त्यांनी खेळखंडोबा केला आहे. त्यामुळे ट्रायल रनच्या उद्घाटनाचा त्यांना कोणत्याही प्रकारचा नैतिक अधिकार नसून महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे संकट असताना करोडो रुपये या ट्रायल रन वर व त्याच्या सुशोभीकरणावर खर्च केले जात आहेत”, असा आरोप केला.
“मुख्यमंत्र्यांनी कोरोना पॅकेज दिले नाही, मृतांचे ढीग लागले आहेत, कोरोना मुळे नागरिक मरत आहेत, लोकांना खायला देखील पैसे नाहीत, आदित्य ठाकरे सुद्धा परिसरात पाहणी करत नाहीत, असे असताना करोडो रुपये या ट्रायल रनच्या नाटकीपणा वर खर्च केले जात आहेत. या विरोधात भाजप कडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे” असे अतुल भातखळकर यांनी सांगितले.