मुंबई राजमुद्रा दर्पण | भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे या भवाबहिनी मधील संबंधाबद्दल सर्वजण जाणून आहे. कधी एकमेकांवर टीका करणे, कधी टोमणे मारणे तर कधी एकमेकांवर राजकीय कुरघोडी करणे. राजकारणात हे काही नवीन नाही… तुझ माझं जमेना…. असे म्हणून बहीणभावांमधला जिव्हाळा मात्र कायम असतो. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमातही यासंबंधीचे दृश्य बघायला मिळाले. निमित्त होतं डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या रूग्णालयाच्य़ा कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे. हा कार्यक्रम डोळ्यांशी संबंधित असल्याने ‘लेन्स’ या शब्दाचा आधार घेऊन पंकजा मुंडे यांनी चांगलीच फटकेबाजी केली.
व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांबाबत लेन्स या शब्दावरून शाब्दीक कोटी करताना पंकजा मुंडे यांनी सद्यस्थितीत शरद पवार यांच्यासारख्या अनुभवाच्या राजकीय लेन्सेस दुसऱ्या कोणाकडेही नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. मुंडे महाजनांच्या लेन्सेसमधून स्वत:ला मोठं करत आज पवार साहेबांच्या लेन्समधून पाहण्याचे भाग्य खूप कमी लोकांना लाभले आणि त्यांच्यात एक आहे धनंजय मुंडे, असा पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा कौतुकाने उल्लेख केला आणि अर्थात टाळ्याही मिळवल्या. आपल्या बहिणीने केलेल्या या जाहीर कौतुकाची परतफेड म्हणून आपल्या भाषणासाठी उठताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंच्या डोक्यावर प्रेमाने टपली मारली.
आपल्या भाषणातही त्यांनी आपल्या नात्याचा हळूवारपणे उल्लेख केला. आपल्याला व्यवहारातले काही कळंत नाही. ही गोष्ट दुसऱ्या कुणाला जरी माहिती नसली तरी आपल्या बहिणीला मात्र माहिती असल्याचा उल्लेख त्यांनी केला. राजकीय वातावरणात पक्के विरोधक असलेले, संधी मिळेल तेव्हा एकमेकांना टोमणे मारणारे असे हे भाऊ बहिण आता मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकमेकांसोबतच्या वागणुकीमुळे चांगलेच चर्चेत आहे.