मुंबई राजमुद्रा दर्पण | देशात काही वर्षांपूर्वी किरकोळ स्वरूपात महागाई होती मात्र सध्या स्थितीला महागाई देशभर आपले हातपाय पसरू लागली आहे. सरकार कडून मिळालेल्या माहितीनुसार मार्चमध्ये ६.९५ टक्के असलेल्या महागाईची टक्केवारी एप्रिलमध्ये ७.७९ टक्के इतकी वाढली आहे.
पेट्रोल, खाद्यपदार्थ आणि गॅसचे दरही वारंवार वाढत असून त्याचा परिणाम दूध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. सर्वसामान्यांना जगण्यासाठी आवश्यक त्या वस्तूंच्या किमतीत भडका उडविणारा महागाईचा आलेख सातत्याने गगनाला भिडतो आहे. त्यातच आता सर्वसामान्यांना आणखी एका भाडेवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे.
वाढती महागाई, सी एन जी चे सातत्याने वाढणारे दर यामुळे रिक्षा टॅक्सी ची भाडेवाढ होणार आहे. गेल्या काही महिन्यापासून सी एन जी चे दर सातत्याने वाढत आहे. याचा आर्थिक बोजा रिक्षा टॅक्सी चालक,मालक यांच्यावर पडत आहे त्यामुळे भाडेवाढीची मागणी केली जात आहे. रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीसाठी इंधनाचे वाढत जाणारे दर आणि त्यामागे प्रति किलोमीटर येणारा खर्च, वाहनाचा देखभाल दुरुस्ती खर्च, नवीन रिक्षा आणि टॅक्सीची किंमत, वार्षिक घसारा, वार्षिक विमा, प्रति वर्ष मोटर वाहन कर, वार्षिक लायसन्स नूतनीकरण शुल्क, प्रति वर्ष परवाना नूतनीकरण शुल्क, उपजीविकेचा वार्षिक खर्च लक्षात घेऊन भाडेसूत्रानुसार दर निश्चित केले जातात.शासनाने नेमलेल्या खटूवा समितीच्या शिफारशी नुसार ही भाडेवाढ होणार आहे. खटूवा समितीची लवकरच बैठक होऊन रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. टॅक्सी चालकांची 5 रुपयाने तर रिक्षा चालकांची 3 रुपयाने भडे वाढ करण्यात यावी अशी मागणी आहे.