महाराष्ट्र राजमुद्रा दर्पण | गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील राजकारणात खा.नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांनी खळबळ माजवली होती. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा उद्गार केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोपही केले होते.त्यामुळे रणा दाम्पत्यांना गजाआड देखिल टाकण्यात आले होते.
यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राणा दाम्पत्यावर गंभीर आरोप केले होते. राणा यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या युसूफ लकडावाला याच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना वाद चांगलाच पेटला होता.
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापवणारे राणा दाम्पत्य आणि खासदार संजय राऊत सध्या लेह-लडाखच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातला एक फोटो समोर आला आहे. महाराष्ट्रातले हे कट्टर विरोधक लेह-लडाख दौऱ्यात चक्क एकत्र जेवण करताना दिसत असून. विशेष म्हणजे संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकमेकांसोबत गप्पा मारताही दिसून आले.
हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या आणि टीकेच्या फैरी झाडणारे संजय राऊत आणि राणा दाम्पत्य जेवणाच्या टेबलावर एकत्र आले. त्यांनी केवळ जेवणाचा तर आस्वाद घेतलाच शिवाय संवादही साधल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.