मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या दराने सोमवारी राज्यभरात उच्चांक गाठला असून राज्यातील अनेक बड्या शहरात पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहेत. सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरांवर सामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. या इंधन वाढीच्या मुद्द्यावर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आपले मत व्यक्त केले.
“मोदी सरकारची ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जनतेला भेट – महाराष्ट्रात जवळपास ३० जिल्ह्यात पेट्रोलने शंभरी पार केली. ७० वर्षात पेट्रोल डिझेलवर प्रचंड अन्याय झाला होता. मोदींनी पेट्रोल डिझेलवरचा अन्याय दूर केला आहे. मोदी सरकार जनतेला संकट काळात मदत करण्याऐवजी सूड उगवत आहे. काँग्रेस ने २०१४ ला सत्ता सोडली, त्यावेळी क्रूड ऑइल १०८ डॉलर होते. पेट्रोल जवळपास ७० रूपये होते. आज क्रूड ऑइल जवळपास ६७ डॉलर आहे पण पेट्रोल १०० पार गेले आहे. गेले ७ वर्षे पेट्रोल डिझेल वर एक्साईज ड्युटी लावून २० ते २५ लाख कोटी काढले. गेले कुठे? मोदी सरकारचे कर्तृत्व यातून दिसते”, अशा शब्दात सचिन सावंत यांनी ट्विट करता मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.