जळगाव राजमुद्रा दर्पण | जळगावच्या खड्ड्यांवरुन सोशल मीडियावर अनेक पोस्ट नेहमीच व्हायरल होत असल्याने जळगावच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची महती राज्यभर पसरली आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे उडणारा धुराळा हा काही नवीन विषय नाही.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवरून एक पोस्ट टाकल्यामुळे जळगावच्या रस्त्यांचा विषय पुन्हा समोर आला आहे. महापालिकेत शिवसेनेच्या महापौर आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्रीही शिवसेनेचे आहेत एवढेच काय तर राज्यात मुख्यमंत्रीही शिवसेनेचे असतांना राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याकडून जळगावकरांसाठी सर्वात महत्त्वाचा विषय असलेल्या रस्त्यांवरुन टोकाचे वक्तव्य केल्यामुळे रस्ते आणि त्यावरील खड्डे हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
अगदी रस्त्यांवरील खड्यांच्या विषय पेटवून भाजपाने महापालिकेत उडी टाकली होती. मात्र त्यानंतर बर्याच राजकीय घडामोडी घडल्या. आता महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांच्या जोडीला राष्ट्रवादीची ताकद देखील आहे. शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष राज्यातही सत्तेत असल्याने महापालिकेला निधी मिळण्यात काहीच अडचण येत नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी शहरातील रस्त्यांच्या कामासाठी निधी पदरात पाडून घेतला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम देखील सुरु झाले आहे. मात्र शहरातील रस्ते अद्यापही खड्डेमुक्त झालेले नाहीत.
आता रस्त्यांवरून गाडी चालवत असताना त्या गाडीचा खुळखुळा होईल इतकी बिकट परिस्थिती या रस्त्यांची झाली आहे. पावसाळ्यात अजून किती हाल सामान्य नागरिकांना सोसावे लागणार हे बघावे लागेल.