जळगांव राजमुद्रा दर्पण | सकाळीच रिक्षा चालकांनी भाडेवाढ बद्दल मागणी केली त्याबरोबरच जीवनावश्यक वस्तूमध्ये येणारे गॅस सिलेंडर देखिल 3 रुपये 50 पैशांनी महाग झाल्याचे समजते.
कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे.आज घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 3 रुपये 50 पैसे इतकी वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी दरवाढ असून या दरवाढीमुळे जळगावात 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1008 रुपयांवर गेली आहे.
12 दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची दरवाढ करण्यात आली होती तर आता 3 रुपये 50 पैसे इतकी वाढ झाली आहे.
जळगावात यापूर्वी गॅस सिलिंडरच्या किमतीने हजाराचा टप्पा ओलांडला आहे. या दरवाढीमुळे आजपासून 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत दिल्ली आणि मुंबईत 1003 रुपये, कोलकात्यात 1029 रुपये, चेन्नईत 1018.5 रुपये इतका झाला आहे.घरगुती गॅस सिलेंडरच्या दरासोबतच व्यवावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातही 8 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून 19 किलो गॅस सिलेंडरचा दर दिल्लीत 2354 रुपये, कोलकात्यात 2454 रुपये, मुंबईत 2306 रुपये आणि चेन्नईत 2507 रुपये इतके मोजावे लागणार आहेत.
7 मे रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे भाव 10 रुपयांनी घसरले होते. तर 1 मे रोजी यामध्ये तब्बल 100 रुपयांची वाढ झाली. त्याचवेळी मार्च महिन्यात दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 2012 रुपये इतकी होती. 1 एप्रिलला 2253 रुपये इतका दर होता तर 1 मे रोजी हा दर 2355 रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षभरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 750 रुपयांनी वाढ झाली आहे.