मुंबई राजमुद्रा दर्पण | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा थांबवण्यात आला आहे. राज ठाकरे 5 जून ला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार होते, परंतु काही कारणास्तव या दौऱ्याला स्थागिती देण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन आता राजकारणात चांगलीच चर्चा होत आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार त्यांचा हा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. येत्या पाच जूनला राज ठाकरे अयोध्या दौरा करणार होते. पण राज ठाकरे यांच्या दौऱ्याला उत्तरप्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी जोरदार विरोध केला होता. राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येत पाय ठेवावा अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली होती.
राज ठाकरे येत्या 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. या दौऱ्याच्या निमित्ताने मनसे अयोध्या आणि शरयू नदीकाठी शक्तिप्रदश्न करण्याची जोरदार तयारी करण्यात आली होती. या दौऱ्यासाठी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते अयोध्येत जाणार होते. यासाठी मनसेतर्फे 10 ते 12 रेल्वे गाड्या बूक करण्यात आल्या होत्या. दौऱ्याआधी मनसेचं एक शिष्टमंडळही अयोध्येला रवाना होणार होते.
यावर आता मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला होता. राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा मनसेने दिला होता. यासंदर्भातले बॅनर मुंबईतल्या लालबाग परिसरात लावण्यात आले होते. या बॅनरमुळे आता मनसेही उत्तर देण्यासाठी तयार असल्याचे पहायला मिळत होते. मात्र, हा दौरा स्थगित झाल्याने वादामध्ये तात्पुरती शांतता पसरली आहे.