अमळनेर राजमुद्रा दर्पण | पावसाळ्यात पिंपळे आणि ढेकू रोड वर असलेल्या नाल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागताे. यामुळे पालिकेने मोहीम हाती घेऊन पिंपळे नाल्याची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. या नाल्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साठून राहणार नाही याचे पालिकेने नियोजन केले आहे.
ढेकू व पिंपळे रोड परिसरात पावसाळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तर काही रहिवाशांच्या घरात पाणी घुसून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान होते. मंगरूळ शेत शिवारातून हा नाला शहरातून वाहत जातो. या नाल्यावर बऱ्याच ठिकाणी नागरिकांनी अतिक्रमण करून अडवल्याने पाणी कॉलनी परिसरात घुसते. पालिका प्रशासन त्यावेळी मोहीम राबवून पाणी पास करते. मात्र, यावर ठोस कारवाई व्हावी, यासाठी पालिकेच्या प्रशासक सीमा अहिरे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी नाल्यात साचलेला गाळ काढून सफाई सुरू केली आहे. मंगरूळ शिवारकडून येणारा हा नाला आर. के. पटेल कारखान्यामागून येऊन पुढे शेतकी संघाच्या बाजूने येतो व पुढे तो धुळे रस्त्याकडून जाऊन पिंपऱ्या नाल्याला मिळतो.
पावसाळ्यात या नाल्यांमध्ये पाणी साचून पाणी रहिवासी वस्तीमध्ये जात असे त्यामूळे नाल्यांचे खोलीकरण करण्यात येत आहे. पाण्याला निर्माण होणारे अडथळे मोकळे करून पाणी शहरात घुसणार नाही, अशी उपाययोजना केली जात आहे. शहराच्या मध्यवर्ती नाल्यांचे खोलीकरण, गाळ काढण्याचे व शहरातील मोठया गटारीवर सिमेंटचे ढाबे टाकण्यात आले आहेत.