पुणे राजमुद्रा दर्पण | राज ठाकरे यांनी आज पुण्यात सभेचे नियोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड घडली आहे. नाराज वसंत मोरे यांची राज ठाकरे यांनी समजूत काढली तरी मात्र वसंत मोरे यांची नाराजी दूर झालेली नाही, असेच दिसून येत आहे. राज सभेआधीच रात्री वसंत मोरे यांनी मोरे बागेत बैठक घेतली. त्यामुळे पुण्यात आज नक्की काय घडणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, अनेक मनसे कार्यकर्त्यांनी पक्षाला टाटा बाय बाय करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी मोरे बागेत घेतलेल्या सभेची पुण्यात जोरदार चर्चा रंगत आहे. वसंत मोरे यांच्या या बैठकीला मनसेचे अनेक पदाधिरी उपस्थित होते. वसंत मोरे यांनी शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शहर पदाधिकारी सभेच्या तयारीत असताना मोरे बैठक घेण्यात दंग असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज सभेला वसंत मोरे उपस्थित असतील का, याची चर्चाही रंगत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा होते आहे. या सभेत राज यांचे वक्तव्य काय असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सभास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सुरक्षितता त्याचप्रमाणे नागरिकांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्यात आली आहे
पुण्यात गणेश कला क्रीडा मंडळात राज ठाकरे यांची सभा होणार असून, मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता राज ठाकरे पुण्यात सभा घेत आहेत.