जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक यांचे २५ मे रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जळगावात झालेल्या गर्दीच्या विरोधात त्यांच्या तिनही मुलांच्या नावे शनिपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गर्दी मागे मलिक परिवारातील कुटुंबीयांचा कोणताही दोष नसून ती गर्दी मलिक यांच्या प्रति असलेल्या आदरातून झाली असल्याने त्यांच्या तिन्ही मुलांविरोधातील दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासंदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली.
स्वर्गीय गफ्फार मलिक यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराला फार मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. या गर्दीसाठी मलिक कुटुंबीय जबाबदार नसून गफ्फार मलिक यांच्या प्रेमापोटी सर्वधर्मीय तथा राजकीय पक्षाचे नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते स्वतःहून त्या ठिकाणी उपस्थित होते. यात मलिक कुटुंबाने कोणतेही गर्दी जमवण्यासाठी आवाहन केले नव्हते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला या गर्दी जमवण्यासाठी जबाबदार धरू नये व त्यांच्या तिन्ही मुलांवरील गुन्हा मागे घेण्यात यावा, या आशयाचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे.
गफ्फार मलिक यांचे एजाज अब्दुल गफ्फार मलिक, नदीम अब्दुल गफ्फार मलिक, फैजवा अब्दुल गफ्फार मलिक या तिन्ही मुलांसह पन्नास जणांविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.