यावल राजमुद्रा दर्पण | यावल तालुक्यातील नवती व पीलबाग असलेल्या केळीच्या शेताला आग लागल्याची घटना घडली. या आगीत एकूण तीन लाखांचे नुकसान झाले. ही घटना यावल तालुक्यातील भालशिव शिवारात शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी एकावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. यावल पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून, रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदवणे सुरू होते.
यावल शहरातील खिर्णीपुरा भागातील शेतकरी शेख अयुब शेख गुलाम रसूल यांनी शहरातील रहिवासी डॉ.रावते यांचे भालशिव शिवारातील शेत बटाईने केले आहे. या शेतात त्यांनी नवती व पीलबाग केळीची लागवड करून, पाण्यासाठी ठिबक संच टाकला होता. या शेताला लागून विजय मिठाराम मंदवाडे (रा.यावल) यांचे शेत आहे. या शेतकऱ्याने शनिवारी दुपारी आपल्या शेताच्या बांधावरील कचरा पेटवला होता. या आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेजारील केळी बागेला आग लागली. केळीबाग व ठिबक मिळून सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले. याबाबत शेतकरी शेख अयुब शेख गुलाम रसूल यांनी यावल पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिस नाईक किशोर परदेशी, संदीप सूर्यवंशी यांनी घटनास्थळी पंचनामा केला.