जळगांव राजमुद्रा दर्पण | शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत सर्व तालुक्यातील प्रमुखांना एक मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. मात्र तालुकाप्रमुख ती जबाबदारी पेलू शकतील की नाही यावर माझा विश्वास नाही. असे स्पष्ट वक्तव्य नाराजिसह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांवर शिवसेनेच्या बैठकीत स्पष्ट केले आहे.
26 ते 29 मे दरम्यान संपूर्ण जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे नेते मंडळी येणार असून, हे नेते मंडळी संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढवण्याचे काम करणार आहे याच बरोबर शिवसेनेने कशा प्रकारे प्रगती किंवा अधोगती केली, याबाबतची माहिती ते घेणार असून वरिष्ठांना कळवणार आहेत. या अनुषंगाने अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे विशेष बैठकीचे आयोजन शिवसेनेतर्फे करण्यात आले होते. या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना तालुकाप्रमुखांवर नाराजी व्यक्त केली.
गुलाबराव पाटील म्हणतात की, आतापर्यंत शिवसेना पक्षाने आपल्याला खूप सहकार्य केले, आपल्याला खूप काही दिले, आपल्याला सामावून घेतले. मात्र आता परिस्थिती बिकट आहे. सगळ्यांनी एकत्र येत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अशा वेळी पक्षाला आपली गरज आहे, आणि पक्षासाठी आपण काम करून पक्षाचे संरक्षण केले पाहिजे. ज्या पक्षाने सगळ्यांना खूप काही दिले. त्या पक्षाला आज कार्यकर्त्यांची गरज असताना कार्यकर्ता मागे का पडतोय? प्रत्येक गावामध्ये स्वतःच्या शाखाचा बोर्ड लावा असे आदेश देऊनही कित्येक गावांमध्ये अजून या आदेशाचे पालन करण्यात आलेले नाही.