मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | गेली दीड वर्ष झाले कोविड१९ मुळे कडक लॉकडाऊन लागू असल्याने मनोरंजन क्षेत्र निष्क्रिय झाले आहे. मधल्या काळात काही प्रमाणात चित्रिकरणं सुरु झाले पण त्यावरही आता मर्यादा आल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीची पालकसंस्था म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे पाहिलं जातं. म्हणूनच अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख आदींनी चित्रपट महामंडळाला भरघोस मदत केली खरी; मात्र ही मदत राज्यातील कलाकारांपर्यंत पोचलीच नाही. उलट केवळ आपल्या हितचिंतकांपुरतीच ती मदत देण्यात आली असा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे चित्रपट, साहित्य, कला, सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी एका पत्राद्वारे केला आहे. सोबतच चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याकडे आतापर्यंत करण्यात आलेल्या सगळ्या मदतीचा हिशेब देण्याची मागणीच बाबासाहेब पाटील यांनी केली आहे. त्याचवेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याचं म्हटलं आहे
“गेल्या लॉकडाऊनपासून चित्रपट महामंडळाला मदत होते आहे. अनेक कलाकारांनी ही मदत केली आहे. यात अमिताभ बच्चन, रितेश देशमुख, माधुरी दीक्षित, निर्माते पुनीत बालन आदींनी मदत केली. महामंडळाने ही किती मदत झाली ती जाहीर करावी. इतकंच नव्हे, तर चित्रपट महामंडळाची शाखा केवळ मुंबई आणि पुण्यात नाहीय. कोल्हापूर, नाशिक, सातारा, औरंगाबाद, जळगाव आदी महाराष्ट्रभर या शाखा आहेत. इथे सगळीकडे सदस्य आहेत. गरजवंत आहेत. इथे कुणालाच ही मदत झालेली नाही. केवळ मुंबई-पुण्यातल्या लोकांना मदत करण्यात महामंडळाने धन्यता मानली आहे.” असे वक्तव्य बाबासाहेब पाटील यांनी वृत्तवाहिनीशी बोलतांना संगीतले.
या मदत प्रक्रियेत कलाकार, तंत्रज्ञ यांना रेशन किटचे वाटप झाल्याचं बोलले जात आहे मात्र, हे वाटप कधी, कुणाकुणाला झालं ते कळायला हवं अशी मागणी असलेले पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धर्मादाय आयुक्तांना पाठवून दिलं असल्याचे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात आपण अजित पवारांशी गुरुवारी भेट घेणार असल्याचे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
या आरोपांबाबत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, “हा केवळ प्रसिद्धीसाठीचा स्टंट आहे. पाटील यांनी कलाक्षेत्रात राजकारण आणू नये. महामंडळाने केलेली सगळी मदत ही रीतसर आहे. महामंडळाच्या कार्यालयातून याची सगळी माहिती संबंधितांना मिळू शकते. शिवाय, झालेली सर्व मदत बॅंकेतूनच झाली आहे. त्याचे सर्व दाखले महामंडळात आहेत. झालेल्या या आरोपाची महामंडळ गांभीर्याने दखल घेणार असून पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.