मुंबई राजमुद्रा दर्पण | सध्या मान्सून लांबणीवर गेला आहे, तरीही राज्यात काही ठिकाणी पावसाची रिमझिम बरसात सुरु झाली असून, हवामान खात्याच्या सांगण्यानुसार हा मान्सून नसून मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात पुढील तीन दिवसात विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. किंबहुना राज्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. कोकण आणि गोवा पट्टय़ात २८ मेपर्यंत काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता जूनच्या पहिल्या आठवडय़ात र्नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील. त्यानंतर कोकणमार्गे महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात हे वारे पोहोचतील.
अंदमानपासून सुरू झालेला पाऊस अरबी समुद्रात अडकून पडला. मान्सून श्रीलंकेच्या किनारपट्टीसह तेथील परिसरात अडकला आहे. मान्सून 27 मे रोजी भारतात प्रवेश घेणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे आता मान्सून कोकणसह मुंबईमध्ये येण्याचा प्रवास जूनपर्यंत ढकलला गेलेला आहे.