जळगाव राजमुद्रा दर्पण | केळी उत्पादक शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून कमालीचा अडचणीत सापडला आहे. गारपीट, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, कडक उन्हाळा अशा नैसर्गिक संकटांना तोंड देतांना रोगराई व बाजारपेठेतील चढउतारांना सामोरे जावे लागते.
केळीच्या जागतिक उत्पादनाच्या सुमारे २४.१८ टक्के उत्पादन भारतातले असते. भारतात अंदाजे २ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे. भारतातील एकूण केळी पिकाखालील २३ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. केळीचे पीक घेणारे भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
केळी पिकासाठी राज्यात ७२ हजार हेक्टर जागा आहे. त्यापैकी सुमारे ४५ ते ५० हेक्टर क्षेत्र एकट्या जळगाव जिल्ह्यातच आहे. म्हणून जळगाव जिल्हाला केळीचे आगार मानले जाते. जळगाव केळीचे भरघोस उत्पन्न घेणारा जिल्हा म्हणून राज्यात लौकीक असून येथील केळीचा रंग आकार आणि चव पाहता येथील केळी ही निर्यातक्षम असल्याचे नेहमीच म्हटले जाते. जळगावच्या जैन इरिगेशच्या माध्यमातून टिश्यू कल्चर प्रणालीची केळीची रोपे केळी उत्पादकांना सहज उपलब्ध होत असल्याने केळी उत्पादन वाढण्यासाठी मोठी मदत होत आहे.जळगाव जिल्ह्यातून उत्तर प्रदेश, दिल्ली पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यासह सौदी अरेबिया, इराण, कुवेत, दुबई, जपान व युरोपमधील बाजारपेठेत केळी निर्यात केली जाते. मागील पाच-सात वर्षांपासून खान्देशी केळीला पाकिस्तानात चांगली बाजारपेठ मिळाली आहे. गेल्या दोन- तीन वर्षांत अरब राष्ट्रांत जिल्ह्यातील केळी निर्यात होत आहे.
समुद्रमार्गे इराक, इराण, दुबई, अफगाणिस्तान आदी देशांत केळीची निर्यात होत असते.
जिल्ह्यातून सरासरी ६०० कंटेनर केळी निर्यात केली जाते. एका कंटेनरमध्ये २०० क्विंटल म्हणजे २० टन केळी निर्यात होते. कंटेनर वातानुकूलित असतात. केळी काळजीपूर्वक हाताळून बॉक्सेस मध्ये भरून निर्यात केली जातात. गेल्या वर्षी जिल्ह्यातील सुमारे १५ कोटी रुपयांची बारा हजार टन केळी निर्यात झाली आहे.