जळगाव राजमुद्रा दर्पण | प्रशासनाने दिलेल्या आदेशातील अटी, शर्तींचे पालन न केल्याप्रकरणी बांबरुड खुर्द येथील वाळू लिलावधारकाची ७ लाखांवर अनामत व बँक हमी जप्त केली होती. त्याबाबत औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार पुन्हा चौकशी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश कायम ठेवले. त्या आदेशाविरुद्ध अपील केल्यानंतर अपर विभागीय आयुक्तांनीही अर्ज फेटाळला. अपिलामध्ये महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जप्त केलेली रक्कम लिलावधारकाला परत करण्याचे सांगण्यात आले आहे.
पाचोरा तालुक्यातील बांबरुड खुर्द येथील हा वाळू गट ३२ लाखांची सर्वोच्च बोली लावून भरत निवृत्ती देशमुख यांनी सन २०१५ मध्ये लिलावात घेतला होता. मात्र, अटी व शर्तींचा भंग केल्याने २८ मार्च २०१६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची ६ लाख ३७ हजार ६४० अनामत व बँक हमीचे ६४ हजार रुपये जप्तीचे आदेश दिले होते. त्या विरुध्द देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. त्याअनुषंगाने न्यायालयाने फेरचौकशीचे आदेश दिलेे. या आदेशानुसार २४ एप्रिल २०१७ रोजी जिल्हाधिकऱ्यांनी फेरचौकशी करुन त्यांचा आदेश कायम ठेवला.
लिलावधारकाने अपर विभागीय आयुक्तांकडे ८ नोव्हेंबरला अपील केले. आयुक्तांनी अपील फेटाळले. या आदेशाविरुध्द लिलावधारकाने महसूल राज्यमंत्र्यांकडे अपील अर्ज दाखल केला होता.