जळगांव राजमुद्रा दर्पण | अथक परिश्रमानंतर पीक कर्ज मंजूर झाले. हेच पीक कर्ज काढण्यासाठी स्टेट बँकेच्या एटीएममध्ये गशेतकरी गेला. तिथे एका ३५ ते ४० वर्षीय भामट्याने चतुराईने एटीएम कार्डची अदलाबदल करून ३६ हजार रूपये काढून घेतले.
हा फसवणुकीचा प्रकार चाळीसगाव शहरात समाेर आला आहे. या प्रकरणी अज्ञात भामट्याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
पिंप्री गणेशपूर येथील सतीश दगडू चव्हाण यांच्या आईच्या नावावर शेती असल्याने त्यांच्या नावे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गणेशपूर शाखेत खाते उघडले आहे. या खात्याचा बँकिंग व्यवहार सतीश चव्हाण हेच पाहतात. या खात्यात नुकतेच ४६ हजार रुपयांचे पीक कर्ज मंजूर झाल्याने पैसे जमा झाले हाेते. चव्हाण हे बँकेच्या एटीएम कार्डद्वारे या खात्यातून पैसे काढण्यासाठी स्टेट बँकेच्या एटीएममध्ये गेले. मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांना पैसे काढता येत नव्हते. गर्दीत चव्हाणांच्या मागे उभा असलेल्या अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाचा टी शर्ट व जीन्स पँट घातलेला एक इसम येऊन मी पैसे काढून देतो असे त्याने सांगितले. चव्हाण यांनी त्याच्याजवळ एटीएम कार्ड दिले असता त्याने ते मशिनमध्ये टाकून चव्हाणांना एटीएम पिन टाकण्यास सांगितले. परंतु तरीही एटीएममधून पैसे निघाले नाहीत. तेव्हा इसमाने चव्हाणांना दुसरेच एटीएम कार्ड दिले. ते घेऊन ते घरी आले.
शेतकरी सतीश चव्हाण 20 मे रोजी एचडीएफसी बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता तिथे त्यांना आपले एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी २३ रोजी जेडीसीसी बँकेच्या गणेशपूर शाखेत जावून कार्डची चौकशी केली असता त्यांच्याजवळील एटीएम कार्ड हे दुसऱ्या महिलेचे असल्याचे त्यांना कळाले.