जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शिवाजीनगर परिसरातील बगीच्या मधील मीटर बॉक्सला मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास ओव्हरलोड मुळे शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. त्यामुळे शिवाजीनगरात एकच गोंधळ उडाला होता. स्थानिक नागरिकांनी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांना फोन करून या बाबत माहिती दिली. दारकुंडे यांनी महावितरण विभागात याबाबतची तक्रार करून तात्काळ वीज पुरवठा खंडीत करण्यास सांगितल्याने पुढील अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर मधील बगीच्या परिसरात असलेल्या प्लास्टिकच्या मीटर बॉक्सला ओवरलोड मुळे शॉर्टसर्किट होऊन मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांतर्फे नगरसेवक तसेच महावितरणाला देऊन तात्काळ वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांनी वाळू रेतीच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली. शिवाजीनगर मध्ये याआधीही अशाच प्रकारचे प्लास्टिक मीटर बॉक्सला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी याबाबत वेळोवेळी तक्रार करून हे प्लास्टिक मीटर बॉक्स काढून टाकण्याची मागणी केली आहे. मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
नागरिकांकडून होणारी वीजचोरी रोखण्यासाठी प्रत्येक विभागातील मर्यादित घरांचे मीटर विशिष्ट अंतरावर असलेल्या प्लास्टिकच्या पेटीत लावण्यात आले असून तिथून घरांना वीजपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही काळापासून या प्लास्टिक मीटर बॉक्सला आगी लागण्याच्या घटना शिवाजी नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून हे मीटर बॉक्स काढून टाकण्याची मागणी स्थानिकांच्या वतीने करण्यात येत आहे. या विषयावर गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशाराही स्थानिक नागरिक व नगरसेवकांच्या वतीने देण्यात आलेला आहे.