नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण | दक्षिण भारत हा भात प्रेमी म्हणून सर्वत्र ओळखला जातो. विविध प्रकारचा तांदुळ विविध कारणांनी आणि तितक्याच बहुविध पद्धतींनी याठिकाणी वापरला जातो. तांदुळ किंवा तांदळापासून बनवण्यात आलेल्या पदार्थांची दक्षिण भारतात अनेक प्रकार पाहायला मिळतील.
मात्र कोरोना महामारीमुळे दक्षिण भारतातील भाताची पद्धतच बदलली आहे. आणि तिथे सर्वांच्या खाण्यापिण्याच्या सवयीसुद्धा बदलल्या. सूत्रांच्या माहितीनुसार देशभरात पाकिटबंद गव्हाच्या पिठाची विक्री वाढली असून, याचं 18 टक्के प्रमाण दक्षिण भारतातून असल्याचे कळते आहे. 2020 मध्ये हे प्रमाण 15 टक्के इतके होते. जाणकारांच्या मते, कोरोना काळात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या सामग्रीमध्ये तांदुळासोबतच गव्हाचे पीठही देण्यात येत होते. याचेच परिणाम आता गव्हाच्या पिठाच्या वाढलेल्या मागणीत परावर्तित झाले आहेत. दक्षिण भारतात गव्हाच्या पिठाची वाढलेली विक्री हा विषय सध्या संपूर्ण देशात चर्चेत आला आहे. मुख्य म्हणजे या भागात जाणाऱ्या पर्यटकांसाठीही ही सकारात्मक बाब आहे, कारण तांदुळाचे पदार्थ खाऊन एका वेळेस कंटाळा आल्यास अशा मंडळींनाही काही पर्याय नव्यानं उपलब्ध असतील.
दक्षिण भारतात तर, तांदुळ, भात आणि तत्सम पदार्थांकडे पूर्ण अन्न म्हणून पाहिले जाते. पण, PMGKY योजनेअंतर्गत गरीब आणि गरजूंना गव्हाचे पीठ उपलब्ध झाले आणि त्यांना याची सवयही लागली.