जळगांव राजमुद्रा दर्पण | पट्टेदार वाघांसाठी देशभरात सुप्रसिद्ध असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील ( वडोदा ) वनक्षेत्रास नऊ महिन्यांनंतर कायमस्वरुपी वनपरीक्षेत्र अधिकारी मिळाले.. यामुळे वन्यप्रेमीमध्ये आनंद व्यक्त होताना दिसत आहे. या वनविभागाला करमचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. अखेर त्याचे यश मिळाले.
पट्टेदार वाघांचे क्षेत्र असलेल्या या भागात आठ ते दहा वाघांचा मुक्त संचार आहे. जंगलाला उत्तरेकडे लागुन असलेली मध्य प्रदेश वनहद्द, पुर्वेस बुलढाणा जिल्हा तसेच दक्षिणेस पुर्णा नदी व पश्चिमेस तापी नदी आहे. पट्टेदार वाघांचा कायमस्वरूपीचा
अधिवास हा या जंगलाचे महत्त्व दर्शवतो. वन्यजीव संवर्धन होणे काळाची गरज असताना, अवैध वनचराई, अतिक्रमण, वृक्षतोडीसारखे गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी वनक्षेत्रातील परीपुर्ण पदभारासह सक्षम वनाधिकाऱ्याची गरज या वनक्षेत्रास आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये तत्कालीन वनक्षेत्रपाल यांची वन्यजीव पाल येथे बदली झाली. दरम्यान येथील अतिरीक्त प्रभारी पदभार मुक्ताईनगर वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल ए आर बच्छाव यांचेकडे देण्यात आला होता. तसेच मध्यंतरी फिरते गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल थोरात यांनीही काही दिवस सदर पदभार सांभाळला होता.येथे कुणीही नवीन अधिकारी रुजु न झाल्याने वन्यप्रेमींमध्ये तसेच स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.
नऊ महिन्यांनंतर या वनक्षेत्रात वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांची नियुक्ती झाली. सचिन ठाकरे यांनी दि. २५मे रोजी पदभार स्वीकारला. सचिन ठाकरे यांनी यापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील नवेगांव बांध वाघझिरा व्याघ्र प्रकल्पातुन वनपाल पदावरुन पदोन्नती होवुन आले आहे.