लखनऊ राजमुद्रा दर्पण | बागपत जिल्ह्यातील छपरौली भागात पोलिसांच्या छापेमारी दरम्यान आरोपीची आई आणि बहिणीचाही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रकार समोर आला आहे.
पोलीस अधीक्षक नीरज जदौन यांनी 26 मे रोजी पीटीआयला सांगितले की, अनुराधा (49) आणि तिची धाकटी मुलगी प्रीती (17) यांनी मंगळवारी छपरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बछोड गावात पोलिसांच्या छाप्यादरम्यान विष प्राशन केले. त्यांच्यावरही मेरठमधील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. बुधवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले. अनुराधा यांची मोठी मुलगी स्वाती (19) हिचा बुधवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
3 मे रोजी छपरौली गावातील ग्रामस्थांनी गावातील प्रिन्स नावाचा तरुण आपल्या मुलीसह पळून गेल्याची तक्रार पोलिसात केली होती. या प्रकरणी पोलीस सातत्याने मुलाच्या घरावर छापे टाकत होते. मंगळवारी सायंकाळी आरोपी आणि मुलगी गावातच घरी असल्याची माहिती फिर्यादीकडून पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन सायंकाळी उशिरा पोलीस छापा टाकण्यासाठी गेले. दरम्यान, घरात उपस्थित आरोपी तरुणाची आई अनुराधा आणि दोन बहिणींनी सल्फा आणि उंदीर मारणारे औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
एसपी नीरज जदौन यांनी सांगितले की, नातेवाईकांच्या तक्रारीच्या आधारे छपरौली पोलीस ठाण्यात नरेश पाल याच्या सोबतच सहा जणांविरुद्ध छळ आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.